एकात्मिक उर्जा विकास योजनेतंर्गत झालेल्या कामांची त्रिस्तरीय समिती मार्फत ऑडिट होणार – खासदार इम्तियाज जलील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ औरंगाबाद परिमंडळाची आढावा बैठक मुख्य कार्यालय महावितरण येथे संबंधित अधिकाऱ्यांसोबत पार पडली. बैठकीमध्ये विभागांतर्गत असलेल्या सर्व प्रकरणे, योजना, प्रकल्प, केंद्रीय निधीतुन झालेली कामे, नागरीकांचे प्रलंबित प्रश्न व समस्याबाबत सविस्तर चर्चा करुन सर्वसामान्य नागरीकांना पावसाळ्यात सुध्दा सुरळीत विज पुरवठा व्हावा याकरिता अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी केल्या.

बैठकीच्या सुरवातीस मुख्य अभियंता यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अंतर्गत होणारी विकास कामे तसेच औरंगाबाद परिमंडळात शहरी व ग्रामीण भागात शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या योजना व प्रकल्पांची सविस्तर माहिती खासदार इम्तियाज जलील यांना दिली. त्यामध्ये प्रामुख्याने एकात्मिक उर्जा विकास योजना १ व २, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना १ व २, उच्चदाब वितरण प्रणाली जोडणी, मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जिल्हा नियोजन समिती निधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानी योजना, बिसरा मुंडा योजना, एचएलएफ योजना, एम.आय.डी.सी. रेड ग्रेड योजना आणि महाविरण आपल्यादारी या योजना व प्रकल्पांतर्गत कामाची सद्यस्थिती त्यामध्ये कामाचे उद्दिष्ट, साध्य व किती कामे प्रगतीपथावर आहे याची सविस्तर माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी खासदार इम्तियाज जलील यांना दिली. खासदार इम्तियाज जलील यांनी बैठकीत कोरोना काळात विद्युत अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र दिलेल्या सेवेचे कौतुक करुन खरा योध्दा म्हणून संबोधले. विद्युत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासनदरबारी प्रलंबित असलेले कामे यशस्वी पाठपुरावा करुन सोडविण्याचे आश्वासन सुध्दा दिले. सदरील बैठकीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, अभियंत्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

रस्त्याच्या मध्यभागात असलेले विद्युत पोल त्वरीत हटवा :

औरंगाबाद शहरातील प्रमुख रस्ते रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत पोल हटविण्याचे काम प्रलंबितच आहे. त्यामुळे रस्ते तयार करण्यास अनेक अडचणी निर्माण होवुन अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महावितरणकडे निधीची कमतरता असल्याने पोल हटविण्याचे काम प्रलंबित असल्याचे अधिकारी वारंवार लोकप्रतिनिधी यांना उत्तर देत असल्याने शासनस्तरावरुन जिल्हा नियोजन समिती अंतर्गत रस्त्यावरील पोल हलविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तरी सुध्दा रस्त्याच्या मध्यभागी असलेले विद्युत पोल हटविण्यात आले नसल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली. औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधींनी सुचविलेले प्रमुख रस्त्यावरील विद्युत पोल हटविण्याचे कामास प्राधान्य देवुन त्वरीत काम सुरु करण्याचे सुचना खासदार इम्तियाज जलील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

Leave a Comment