हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी तुम्ही संध्याकाळी आकाशात चंद्रासोबत शुक्र ग्रह पाहिला होता. जगभरातील लोक त्या खास दृश्याचे साक्षीदार झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी आणखी एक आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहण्याची उत्तम संधी मिळणार आहे. 28 मार्च रोजी पृथ्वीवरून एकाच वेळी 5 ग्रहांचा संगम पाहायला मिळणार आहे. हे पाच ग्रह एका सरळ रेषेत असतील. या ग्रहांमध्ये बुध, गुरू, शुक्र, युरेनस आणि मंगळ यांचा समावेश आहे. चला जाणून घेऊया ही ऐतिहासिक घटना आपण केव्हा पाहू शकतो….
आकाशातील ही अनोखी खगोलीय घटना मंगळवारी म्हणजेच 28 मार्च रोजी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळणार आहे. यासाठी मंगळवारी सूर्यास्तानंतर तुम्हाला पश्चिम क्षितिजाकडे पहावे लागेल. क्षितिज रेषेपासून आकाशाच्या मध्यापर्यंत हे 5 ग्रह पसरलेले दिसतील. या पाच ग्रहांमध्ये शुक्र सर्वात तेजस्वी असण्याची शक्यता आहे. बुध आणि गुरू क्षितिजाजवळ दिसतील. युरेनस शोधणे थोडे कठीण असेल. परंतु मंगळ आणि चंद्र यांच्यातील अंतर कमी असेल.
गुरू, शुक्र आणि मंगळाचे तेज प्रबळ असल्याने ते ग्रह तुम्हाला सहज पाहता येतील. तर बुध आणि युरेनस दिसणे कठीण आहे, त्यासाठी कदाचित तुम्हाला दुर्बीण घ्यावी लागू शकते. साधारणपणे पाचही ग्रह एका सरळ रेषेत दिसत नाहीत. परंतु जेव्हा पृथ्वीवरून पाहिले जाते तेव्हा ते जवळजवळ एका रेषेत दिसतील. तुम्हाला सुद्धा खगोलशास्त्रात रस असेल तर या अनोख्या खगोलीय घटनेचे नक्कीच साक्षीदार व्हा आणि ही ऐतिहासिक घटना पहा.