दरोड्यातील सोने आणि रोकड लांबविणारा तरुण रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बंगळुरू शहरात टाकलेल्या दरोड्यात सुमारे साडेपाच किलो सोने व रोकड घेऊन पसार होणाऱ्या तरुणाच्या रेल्वे सुरक्षा दलाने मुसक्या आवळल्या. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करण्यात आली. उमेंद्र शाही (३५, रा. पनाथूर, बंगळुरू) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, बंगळुरू शहरातील महालक्ष्मीपुरम भागातील घरात उपेंद्र शाही आणि त्याच्या साथीदारांनी दरोडा टाकला. दरोड्यातील साडेपाच किलो सोने आणि रोकड घेऊन पसार झालेला मुख्य संशयित उमेंद्र हा एलटीटी- गोरखपूर एक्स्प्रेसमधून जात असल्याची माहिती तेथील जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एच. ए. मंजू यांनी रेल्वे सुरक्षा दलाचे आयुक्त एच. श्रीनिवास राव यांना दिली.
त्यांनी निरीक्षक आर. के. मीना यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्याअनुषंगाने निरीक्षक मीना यांच्यासह उपनिरीक्षक के. आर. तरड, एन. के. सिंग, सुभाष राजपूत, महेंद्र कुशवाह, के. एस. वसावे, विनोद कुमार आणि ए. ए. हंसराज वर्मा आदींच्या पथकाने एलटीटी- गोरखपूर एक्स्प्रेस भुसावळ येथील स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर आल्यानंतर एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करत तपासणी केली. मात्र, तो मिळून आला नाही. त्यानंतर निरीक्षक मीना यांनी अधिकारी व कर्मचारी मिळून चार जणांची पथके तयार करुन धावत्या गाडीत तपासणी केली. त्यावेळी संशयित शाही हा ए-१ या बोगीत पथकाला मिळून आला.
पथकाकडे असलेले छायाचित्र व संशयित एकच असल्याची खात्री होताच संशयिताला अटक करण्यात आली. रावेरमध्ये एक्स्प्रेस पोहोचल्यावर त्याला भुसावळमध्ये नेण्यात आले. संशयिताला बंगळुरू येथील पोलीस पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. संशयित शाहीसोबतच्या तीन-चार चोरट्यांनी लांबविलेला ऐवज आपापसांत वाटून घेतला. संशयिताजवळ १४ हजार १५० रुपये व तीन हजार ९०० रुपयांचे नेपाळी चलन मिळाले. संशयिताला अटक केल्यानंतर त्याच्याजवळ सोने मिळाले नाही. त्याने सुरत येथे सोने दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून त्या दिशेने तपास केला जात आहे. संशयिताविरुद्ध मुंबई, बंगळुरू, मंगळुरू, सुरत, वर्सोवा, कोसंबा (सुरत), अप्परपेठ, वाशी, कुकटपल्ली यांसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.