खटाव | कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरातील पाच बंद दुकानांवर चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे. चोरट्यांनी पाच दुकाने फोडून चोरट्यांनी एक हजाराच्या रोख रकमेसह 33 हजार 200 रुपयाचे चांदीचे व सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. एकाचवेळी बाजारपेठेतील पाच दुकाने फोडल्याने व्यावसायिकांच्यात घबराटीचे वातावरण आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कातरखटाव येथील ग्रामपंचायत परिसरात असलेल्या महालक्ष्मी हार्डवेअर, श्री राम ज्वेलर्स, प्रियांका ज्वेलर्स, सतीश ज्वेलर्ससह एका देशी दारूच्या दुकानांत मंगळवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. यामध्ये तरसवाडीचे रहिवासी दत्तात्रय पवार यांच्या कातरखटाव येथील श्रीराम ज्वेलर्सचे शटर उचकटून ३२० ग्रॅमचे पैंजण, चार ग्राम सोने असा एकूण 31 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास केला. सतीश ज्वेलर्स यांच्या दुकानाची कडी तोडून गळ्यातील ताईतपेटी, चांदीच्या राख्या व पन्नास चांदीच्या लहान देवाच्या पट्ट्या असा एकूण 2 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. महालक्ष्मी हार्डवेअरचे शटर उचकटून ड्रॉव्हरमधील 1 हजार रुपये रोख व किरकोळ साहित्य चोरून नेले. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा प्रियांका ज्वेलर्स या दुकानाकडे वळविला. या दुकानाचे शटर उचकटून आतील लोखंडी ग्रिलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
गावच्या पूर्व बाजूकडील नरवणे रस्त्यावरील एका देशी दारूच्या दुकानाचे शटर उचकटून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. या गुन्ह्याची वडूज पोलिसात नोंद झाली असून, पोलिस उपनिरीक्षक मालोजीराजे देशमुख पुढील तपास करीत आहेत.