रशियाविरोधात निषेध प्रस्तावावर भारताने मांडली ‘ही’ भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युद्ध सुरू असून हे युद्ध थांबवण्यासाठी आणि रशियन सैन्याला माघारी बोलावण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मध्यरात्री मतदान पार पडलं. यावेळी भारताने रशियाला विरोध न करता पुन्हा एकदा तटस्थ भूमिका घेतली आहे. भारताने मतदान केलं नसलं तरी हिंसेचा भारताने विरोध केला आहे. युक्रेनमधील परिस्थितीमुळे चिंतेत असल्याचे भारताने म्हटलं आहे.

यावेळी रशियानं प्रस्तावावर व्हिटो पॉवर वापरली. सुरक्षा परिषदेत ५ स्थायी सदस्यांमध्ये रशियाचा समावेश आहे. तर भारत, चीन आणि यूएईनं हल्ल्याचा निषेध करत मतदानात भाग घेण्याची भूमिका घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत यूक्रेनवरील हल्ल्याचा निषेध करणारा प्रस्ताव मांडला. त्यात १५ पैकी ११ देशांनी मतदान केले. तर रशियाने प्रस्तावाविरोधात व्हिटो पॉवरचा वापर केला. यावेळी भारताने तटस्थ भूमिका घेतली.

यावेळी, अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी भारताकडे मदत मागितली होती. मात्र भारताने तटस्थ भूमिका घेतल्याने अमेरिका नाराज होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नाटोकडूनंही युक्रेनला थेट लष्करी मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्धात युक्रेन सध्या एकटं पडल्याचं पाहायला मिळत आहे.