व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लस न घेणारे हजारावर नागरिक कोरोनाबाधित

औरंगाबाद – कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या काही महिन्यांपासून लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पण अद्याप अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातील तीन हजार 340 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी महापालिकेच्या वॉर रूममधून काळजी घेतली जात आहे. वॉररूममधून संपर्क साधण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल एक हजार 75 जणांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वीस दिवसांत सुमारे सहा हजार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान अनेकांना तीव्र लक्षणे नसल्याने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या वॉररूममधून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांशी दिवसांतून तीनवेळा संपर्क साधला जात असून, त्यासाठी वॉररूममध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तीन दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या तीन हजार 340 रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यात लस घेतली आहे का? असा प्रश्‍नही रुग्णांना करण्यात आला असता दोन हजार 44 रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले तर लसीचा एक डोस घेतलेला आहे, असे 221 जणांनी सांगितले. एक हजार 75 जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे सांगितले.