काळ्या बाजारात गॅस सिलेंडर विकणाऱ्या तिघांना अटक; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर | नऊशे रुपये शासकीय दराने मिळणार स्वयंपाकाचा गॅस काळ्या बाजारात 1200 रुपयाला विक्री करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. 11 लाख 39 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल यातून जप्त करण्यात आला आहे. मोहसीना शेख,वसीम शेख,राजशेखर कोळी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

सोलापुरातील गोदूताई नविन विडी घरकुल याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती स्वयंपाकाचा गॅस इलेक्ट्रिक मशीनच्या साहाय्याने विनापरवाना रिक्षामध्ये भरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली तेंव्हा तिथे हा प्रकार आढळून आला.

या कारवाईमध्ये 11 भरलेल्या टाक्या, 05 रिकामी टाक्या, इलेक्ट्रिक मोटार, इतर साहित्य, रिक्षा आणि एक टाटा अल्ट्रा कंपनीची मालवाहतूक गाडी जप्त करण्यात आली आहे.