कॉलेजमध्ये जात असताना मृत्यूने गाठले ! रस्ते अपघातात तिघा भावांचा मृत्यू

परभणी : हॅलो महाराष्ट्र – परभणीमध्ये सोमवारी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये दोन सख्या भावांचा तर एका चुलत भावाचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही कॉलेजला जात असताना हि दुर्घटना घडली आहे. जिंतूर शहरापासून तीन किलोमीटरच्या अंतरावर ट्रक आणि दुचाकीचा हा भीषण अपघात घडला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात हा अपघात घडला आहे.

या अपघातात मृत्यू झालेली तिघंही भावंड ही जिंतूरच्या मालेगाव या ठिकाणचे रहिवाशी आहेत. अकोली शिवारातील रस्त्यावर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे. अभिषेक म्हेत्रे, योगेश म्हेत्रे आणि रामप्रसाद म्हेत्रे अशी मृत भावंडाची नावे आहेत. परभणी जिल्ह्यात आजपासून महाविद्यालयं सुरु झाली आहेत. त्यामुळे अभिषेक म्हेत्रे हा रामप्रसाद म्हेत्रे याच्याबरोबर आपला छोटा भाऊ योगेश म्हेत्रे महाविद्यालयात सोडण्याकरिता जात होते.

यादरम्यान जिंतूर शहरापासून 3 किमीच्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर असलेले खड्डे चुकवण्याच्या नादात दुचाकी- ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात या तिन्ही भावांचा जाग्यावरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.