Monday, February 6, 2023

पुण्यात आज पोलिसासह ५ जणांचा कोरोनामुळं बळी

- Advertisement -

पुणे । पुण्यात आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात करोना आजारावर उपचार घेत असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. तर गेल्या काही तासांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १०८ झाली आहे. दरम्यान, पुणे मनपा क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १२४३ वर गेली आहे.

मृतक पोलीस कर्मचाऱ्याला होता रक्तदाब, लठ्ठपणाचा त्रास

- Advertisement -

५८ वर्षीय सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. २४ एप्रिल रोजी भारती रुग्णालय धनकवडी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. श्वसनाला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना रक्तदाब आणि लठ्ठपणाचा त्रासही होता, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. राज्यात आत्तापर्यंत कोरोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”