कास पुष्प पठारावर पर्यटकांची मांदियाळी सुरू, 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकींगने प्रवेश

सातारा | सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठारावरील फुलांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. बुधवारी दि. 25 रोजी पहिल्याच दिवशी ऑफलाईन पध्दतीने एकूण 150 हुन अधिक पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती समिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली. कास पठारावर 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन बुकींग असणाऱ्या पर्यटकांनाच पठारावर प्रवेश दिला जाणार आहे.

दोन वर्षानंतर बुधवारी पहिल्याच दिवशी कास पठाराला ऑफलाईन पध्दतीने पर्यटकांनी भेट दिली. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कासचा हंगाम पूर्णपणे बंद होता. मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सातारा, जावली वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून हंगाम सुरू करण्याचे निश्चित केले.

कास कार्यकारी समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे, उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत व सदस्यांच्या हस्ते कास पर्यटन हंगामाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव, बजरंग कदम, ज्ञानेश्वर आखाडे, वनरक्षक सचिव निलेश रजपूत, स्नेहल शिंगाडे, राजाराम जाधव यांच्यासह कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.

You might also like