कराड | कराड- पाटण मार्गावर असलेल्या तांबवे फाटा (साकुर्डी पेठ) येथे मोठी बाजारपेठ उभी राहिली असून तिचे स्वरूप वाढत चालले आहे. या मार्गावरील रस्त्याचेही काम बऱ्यापैकी उरकले आहे. वाहतूकीच्या दृष्टीने कामे उरकली आहेत, मात्र सुरक्षिततेच्या बाबत बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेत असल्याचे पहायला मिळत आहे. या बाजारपेठ परिसरात दररोज अपघात होत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. तेव्हा वारंवारं स्पीडब्रेकर (गतिरोधक) लावण्याची मागणी वाहन चालकांसह, व्यापारी व ग्रामपंचायतीने मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहेत.
कराड शहरापासून काही अंतरावर असलेली ग्रामीण भागातील तांबवे फाटा (साकुर्डी पेठ) येथे तांबवे, साजूर, सुपने, म्होप्रे यासह जवळपास 25 गावातील लोक या बाजारपेठेत येत असतात. तर कोकणात रत्नागिरी, चिपळूण याठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. सध्या पावसाळा सुरू होणार असून पाटणसह कोकणात पर्यटक मोठ्या प्रमाणावर जात असतात. अशावेळी या बाजारपेठेत अपघाताची शक्यता मोठी असून रस्त्यावर गतिरोधक कधी बसविणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गेल्या महिनाभरात तांबवे फाटा (साकुर्डी पेठ) परिसरात 2 ते 3 जणांनी आपला जीव गमवला आहे. अशावेळी गतिरोधक बसवावा अशी मागणी व्यापारी लोकांनी केली असून ग्रामपंचायतीने बांधकाम विभागाला निवेदन दिले तरीही बांधकाम विभागाला जाग येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अपघातातील जीव गमावल्यास त्यास बांधकाम जबाबदार असेल, अशी भावना लोकांच्यातून सांगितली जात आहे.
गतिरोधक बसवा, अन्यथा आंदोलन करणार : किसन थोरात
बांधकाम विभागाला आम्ही वारंवारं साकुर्डी पेठ येथे बाजारपेठ असून गतिरोधक बसविण्याची मागणी केली. परंतु याकडे बांधकाम विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. अशावेळी व्यापारी स्थानिकांसह आंदोलन करण्यात येईल. तेव्हा प्रशासनाने लोकांचे जीव जाण्या अगोदर गतिरोधक बसावावेत. जेणेकरून अपघात टाळता येतील, असे साकुर्डी येथील किसन थोरात यांनी सांगितले.