वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या प्रसंगावधानाने वाचवला अपघातग्रस्ताचा जीव

कराड प्रतिनिधी | अक्षय पाटील

कराड तालुक्यातील महिला वाहतूक पोलीस कर्मचारी पूजा पाटील यांच्या सतर्कतेने आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका अपघाती दुचाकी चालकाचे प्राण वाचले आहेत. अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांच्या या या कामगीरीचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड येथील विजय दिवस चौकात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा रघुनाथ रासकर (वय 57) रा. विद्यानगर-सैदापुर यांचा विजय दिवस चौकात आपल्या दुचाकीवरील ताबा सुटूल्याने अपघात झाला. या अपघातात रासकर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागला. याचवेळी या चौकात कर्तव्य बजावत असणाऱ्या वाहतूक विभागाच्या महिला पोलिस कर्मचारी पूजा पाटील यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ मदत करण्यास सुरूवात केली. जखमी दूचाकी चालकाच्या डोक्यातून जास्त रक्तश्राव होत असल्याने पूजा पाटील यांनी रूग्णवाहिकेची वाट न पहाता जखमी रासकर यांना तात्काळ रिक्षातून सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

कॉटेज येथे प्राथमिक उपचार पार पडल्यानंतर सबंधित जखमीस पूढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी पूजा पाटील यांनी संबंधित जखमी रासकर यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून झालेल्या अपघाताची माहिती दिली. सध्या या रुग्णावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

शहर वाहतूक पोलिस कर्मचारी पूजा पाटील या आपले कर्तव्य बजावत असताना अपघातग्रस्ताला तात्काळ मदत केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी त्यांना होमगार्ड सागर पावणे यांनीही कर्तव्य बजावत असताना मदत केली आहे.