Tuesday, January 31, 2023

गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त भारत सरकारकडून आदरांजली; डाक विभागाच्या इन्व्हलपचे विमोचन

- Advertisement -

बीड : माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले आहे. या लिफाफ्याचे विमोचन ऑनलाईन होणार आहे. त्यासाठी नवी दिल्ली आणि गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कोरोना नियमांमुळे हा कार्यक्रम सर्वांनी ऑनलाईन पाहावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची उपस्थिती राहील. नड्डा यांच्या हस्ते या लिफाफाचे विमोचन करण्यात येणार आहे. तर गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, खासदार भागवत कराड यांची उपस्थिती असेल.

- Advertisement -

दिल्ली आणि गोपीनाथ गडावरुन एकाच वेळी या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे सर्व नेते ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर गर्दी होते. यंदा मात्र, कोरोनामुळे गर्दी होणार नाही.