Satara News उड्डाण पुलावर पंक्चर काढताना ट्रकने उडविले : 2 ठार, 1 जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड येथील उड्डाण पुलावर काल रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास पंक्चर झालेले चाक काढण्यासाठी थांबलेल्या पिकअपला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झालेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुणे बाजूकडून दोन पिकअप जीप साताऱ्याकडे चालल्या होत्या. त्यातील एक पिकअप (MH-09-FL-1257) पाचवड येथील पुलावर पंक्चर झाली. त्यामुळे पाठीमागील दुसरीही पिकअप तेथेच थांबवून पंक्चर झालेल्या गाडीचे चाक काढत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामध्ये चाक काढण्याच्या कामात व्यस्त असलेल्या प्रभास बाळासो शिंदे (वय- 23, रा. भाळवणी, ता. खानापूर) याचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झाल्याने ज्ञानेश्वर तुकाराम बोरडे (वय- 24, रा. गिलस्ती, ता. राजगुरुनगर पुणे), स्वप्नील धनावडे (रा. भाळवणी) या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर बोरडे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघाताची माहिती मिळताच भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी पोलीस जवान गंगावणे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी पाठवले. त्यांनी पुलावरुन दोन्ही पिकअप खाली आणल्या. घटनास्थळाचे पंचनामा करण्यात आला. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.