दुर्दैवी! जुळ्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

चार वर्षीय दोन मुलींचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा

सांगली । वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द मध्ये चार वर्षीय जुळ्या मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली. विद्या बर्गे आणि वेदिका बर्गे असे मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. आज सकाळच्या सुमारास या दोन मुली गावाजवळील बिरोबा मंदीरात खेळण्यासाठी गेल्या होत्या. दुपार झाली तरी मुली घराकडे आल्या नाहीत त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला.

पूर्ण गाव शोधले असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. अखेर सायंकाळी सात वाजता त्या दोघींचे मृतदेह मंदिराजवळील एका तलावात गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्या मुलींच्या कुटुंबियांना देण्यात आली.घरच्यांनी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोनही मुलींचा मृतदेत पाण्या बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

दोनही मुलींचा मृतदेह कुरळप येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like