वाळूज : वाळूजच्या कामगार चौकातून एमआयडीसीच्या दिशेने वळण घेणाऱ्या दुचाकीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. यात दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मित्राला मदत न करता दुचाकीचालक पळून गेला. त्यामुळे मृत तरुणाची ओळख पटू शकली नाही.
शेख फेरोज व अन्य एक तरुण दुचाकीवरून (एमएच 41 एच 8742) कामगार चौकातून जात होते. त्याच वेळी औरंगाबादकडून नगरच्या दिशेने निघालेल्या ट्रकने (एमएच 12 एफझेड 7764) या दुचाकीला पठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण उडून ट्रकच्या चाकाखाली आला व दुरवर फरपटत गेला. त्यामुळे तो जागीच ठार झाला, तर दुचाकीचालक शेख फेरोज हा दूर फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला.
पाठीमागे बसलेला तरुण ठार झाल्याचे लक्षात येताच शेखने सर्वांची नजर चुकवून पळ काढला. कामगार चौकात असलेले वाहतूक शाखेचे पोलीस हेडकॉस्टेबल केशव इधाटे यांनी पोलीस उपनिरीक्षक तहेर पटेल यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर फौजदार पटेल तसेच एम. आर. धोटे, पोना. शिवाजी छडीदार, पोकॉ. मंजित जाधव यांनी मृत्यू तरुणाला घाटीत नेले. तसेच ट्रकचालक सीतारामसिंग भाटिंग (25, रा पुणे) यास ताब्यात घेतले.