दुचाकी चोरी : सातारा, वाई तालुक्यातील सराईत गुन्हेगारांना अटक

सातारा | सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धडक कारवाया करून 4 दुचाकी चोरट्यांना गजाआड केले. या कारवाईत 3 दुचाकीही जप्त केल्या. चोरट्यांनी संबंधित दुचाकी वाठार स्टेशन, सातारा व नऱ्हे (जि.पुणे) येथून चोरल्या असल्याची कबुली दिली. संशयितांमधील काहीजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सातारा, वाई तालुक्यातील रहिवाशी आहेत.

ज्ञानेश्वर विजय जाधव (वय 23, रा. उडतारे, ता. वाई), विजय बाळू जाधव (वय 21, रा. भाडळे, ता. सातारा), अनिकेत अनिल पिसाळ (वय 21), शुभम राजेंद्र आवळे (वय 18, दोघे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गस्त घालत असताना सातारा रोड व शहरातील शनिवार पेठ येथे बंदोबस्तावरील पथकाने काही संशयास्पद दुचाकीस्वारांना अडवले. वाहनांची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी सखोल माहिती घेतली. यावेळी काही दुचाकी चोरीच्या असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दुचाकी जप्त करून संशयितांना ताब्यात घेतले. दुचाकी चोरीबाबत त्या-त्या पोलीस ठाण्यांकडे चौकशी केली असता, चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, फौजदार गणेश वाघ, पोलीस हवालदार संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, अमित सपकाळ, नीलेश काटकर, शिवाजी भिसे, मोहन पवार, गणेश कापरे, स्वप्नील दौंड, प्रवीण पवार, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला.