दुचाकी – चारचाकीच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

खटाव तालुक्यातील जाखणगाव शेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि चारचाकी याच्यात शनिवारी धडक झाली. या अपघातात सुरुवातॆला तीनजण जखमी झाले होते. त्यापैकी दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात कीर्तनकार कुणाल शंकर जाधव आणि अभिजित मधुकर येलगे यांचा मृत्यू झाला असून बाबा निवृत्ती जगदाळे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, भोसरे (ता. खटाव) येथील कीर्तनकार कुणाल शंकर जाधव (वय 23) हे शनिवारी सायंकाळी त्यांच्या दुचाकीवरून सहकारी कीर्तनकार अभिजित येलगे (वय 36, रा. देवाची आळंदी) आणि बाबा निवृत्ती जगदाळे (रा. बोथे, ता. माण) यांना घेऊन पुसेगावच्या दिशेने निघाले होते. औंध-पुसेगाव मार्गावरील पोवई माळ परिसरात त्याची दुचाकी आली असता त्या ठिकाणी टाटा सफारी (एमएच 12 जेएन 2500) या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडले.

या अपघातानंतर कीर्तनकार कुणाल जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर अभिजीत येलगे व जखमी बाबा निवृत्ती जगदाळे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी अभिजित येलगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात कारचालक जीवन पांडुरंग जाधव (रा. गादेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आहे. या घटनेची फिर्याद संकेत जाधव यांनी दिली असून अपघाताची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment