सोमय्यांवरील हल्ल्याची घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती – उदयराजे भोसले

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

पुणे महापालिका आवारात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकानी हल्ला केला. या घटनेनंतर भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सोमय्या यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “किरीट सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे, अशी टीका भोसले यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी टीका करताना पोस्टमध्ये म्हंटले आहे की, “माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांचेवर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय आहे.”

“सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. “ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अश्या हल्याच्या घटना घडल्यास अशा घटनेचे कोणीही समर्थन करु शकणार नाही,”असे भोसले यांनी यावेळी म्हंटले आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्ल्याच्या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून माझ्यावर हल्ला करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीत जाणार आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या हल्ल्याची तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.