साताऱ्यात नगरपालिकेवरून दोन्ही राजेंचे एकमेकांवर गंभीर आरोप; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साताऱ्यातील छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांतील वाद सर्वपरिचित आहे. साताऱ्यात नगरपालिकेच्या मुद्द्यावर आता दोन्ही राजे हे पुन्हा एकदा एकमेकांवर बरसले आहेत. खा.उदयनराजेंच्या आघाडीने नगरपालिका लुटून खाल्ली असा आरोप आ. शिवेंद्रराजेंनी केला आहे तर आमच्या आघाडीने पैसे खाल्ले असते तर कामे झाली असती का? असा सवाल खासदार उदयनराजेंनी केला आहे.

आज साताऱ्यात पार्किंगच्या समस्येसाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यातील व्यापारी नागरिक आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत साताऱ्यातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समस्यांचा पाढा वाचून दाखवला. ही बैठक संपल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर गंभीर आरोप केले.

येणारी नगरपालिका भाजप आणि आम्ही एकत्र लढवणार आहोत. तर उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडी बरोबर आमची तडजोड होणे शक्य नाही. गेली पाच वर्ष खा.उदयनराजेंनी सातारकरांना गोड स्वप्न दाखवलं. पण सर्वांचा स्वप्न भंग झाला आहे. गेल्या गेल्या पाच वर्षात सातारा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी सातारची नगरपालिका हे अक्षरशः लुटून खाल्ली आहे. उलट त्यांची शर्यत लागली होती की तुला जास्त मिळतं की मला जास्त मिळतं. कुठलाही मोठा प्रकल्प या पाच वर्षात करता आला नसल्याची टीका आमदार शिवेद्रराजेंनी उदयनराजेंवर केली.

शिवेंद्रराजेंच्या आरोपांनंतर खासदार उदयनराजे यांनी उत्तर दिले. त्यांनीही माध्यमांशी संवाद साधत त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी उदयनराजे म्हणाले की, आघाडीने पैसे खाल्ले असते तर कामे झाली असती का? त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तसेच बोलताना विचार करून बोलावं. देवानं तोंड दिलं आहे आणि जीभ दिली आहे म्हणून खुशाल बोला, असा टोला उदयराजेंनी शिवेंद्रराजे यांना लगावला.