Wednesday, June 7, 2023

स्टेडियम उभारुन चालणार नाही, दराराही निर्माण झाला पाहिजे – उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तब्बेतीच्या कारणामुळे व्हिडीओ कॉन्फरसद्वारे कार्यक्रम, बैठकींना हजेरी लावली जात आहे. आज नवी मुंबई येथील फुटबॉल महाराष्ट्र सेंटर ऑफ एक्सलन्स कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले. यावेळी”नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही, भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन तिथे भारताचा दरारा निर्माण व्हावा,” अशी इच्छा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

नवी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, फुटबॉल हा केवळ पायाने खेळायचा खेळ नव्हे, यात देखील बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. जितका बुद्धीबळ खेळताना करावा लागतो तितकाच या खेळातही देखील करावा लागतो. वास्तविक मलाही फुटबॉलचे फार ज्ञान नाही, मात्र आदित्यला फुटबॉल खेळायला आवडते.

आज उदघाटन करण्यात आलेल्या या मैदानावर लवकरच महिलांची आशियाई फुटबॉल चषक स्पर्धा पार पडणार आहे. या मैदानावर अनेक फुटबॉलपटू घडतील यात शंका नाही. मात्र, नुसती मैदान बनवून, स्टेडियम उभारुन चालणार नाही. तर त्यासाठी भारताचा संघ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये सहभागी होऊन त्या ठिकाणी भारताचा दरारा निर्माण होणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हंटले.