उद्धव ठाकरेंनी गृहखाते स्वतःकडे घ्यावे; शिवसेना नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्याच्या कारभारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती समोर येत होती तसेच राष्ट्रवादी कडे असलेले हे गृहखाते शिवसेनाला हवं आहे अशाही बातम्या समोर येत आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवावे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे

मागच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखाते होत त्याच प्रमाणे आमचीही विनंती आहे कि उद्धव साहेबानी गृहखाते सांभाळावे. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अशी दोन्ही खाती उद्धव ठाकरे यांनी सांभाळली तर नक्कीच राज्याला चांगली दिशा मिळेल अस मत चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केलं

दरम्यान, भाजप विरोधात शिवसेना आक्रमक असताना राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भाजप विरोधात सॉफ्ट भूमिका घेत आहे अस शिवसेनेच मत आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर एकामागून एक ईडी कारवाई होत असताना गृहखात्याने मात्र आक्रमक भूमिका घेतली नाही असे शिवसेनेचे म्हणणं आहे. भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले गृहखाते हवं आहे अशी माहिती समोर येत आहे