उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर; तब्बल अडीच महिन्यांनंतर जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आजारी पडल्यानंतर प्रथमच एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. जवळपास अडीच महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधित केले होते.

उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठीच्या मणक्याचा त्रास होत होता. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर एच. एन. रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर उद्धव ठाकरे घरीच असून घरातूनच आपलं कामकाज करत आहेत.