उमा भारतींना सतावतेय कोरोनाची चिंता! राम मंदिर भूमिपूजनाला न जाण्याचा घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ । देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसेच राजकीय नेते आणि मंत्र्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमस्थळी उपस्थित न राहण्याचा निर्णय भाजप नेत्या उमा भारती यांनी घेतला आहे. करोना संसर्ग होऊ नये या काळजीपोटी उमा भारती कार्यक्रमस्थळी न येता शरयू नदीच्या काठी उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी उपस्थित निमंत्रितांच्या यादीतील आपले नाव रद्द करावे, अशी विनंतीही त्यांनी ट्रस्टला केली आहे. आपण भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मंदिराच्या ठिकाणी न येता शरयू नदीच्या काठावर येऊ असे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

आज सोमवारी सकाळी उमा भारती यांनी अनेक ट्वीट्स केली आहेत. कालपासून मी अमित शहा आणि अन्य भाजप नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले आहे, तेव्हापासून मी अयोध्येतील मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींची काळजी वाटत आहे. म्हणूनच मी रामजन्मभूमी भूमिपूजनाच्या स्थळी न येता शरयू नदीच्या काठावर उपस्थित राहू असे न्यासाच्या अधिकाऱ्यांना कळवले आहे, असे उमा भारती यांनी म्हटले आहे. भूमिपूजनस्थळी उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांच्या यादीतील आपले नाव रद्द करण्याची विनंतीही यावेळी त्यांनी केली आहे.

मी आज भोपाळा जाणार असून उद्या संध्याकाळी अयोध्येत येईपर्यंत माझी एखाद्या करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर शेकडो लोक उपस्थित असतील, त्या ठिकाणापासून मी लांबच राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे उमा भारती यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथून निघून गेल्यानंतरच आपण तेथे जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment