Thursday, March 23, 2023

कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय, दरवर्षी सव्वा कोटी युवकांची फौज बेरोजगार – प्रा.हरी नरके

- Advertisement -

भारत हा तरूणाईचा देश आहे. जगातले सर्वाधिक तरूण आपल्या देशात आहेत. दरवर्षी आपल्या देशात सुमारे दोन कोटी युवक युवती शिकून नोकरी – व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतात. त्यातील सुमारे ७५ लक्षांना खाजगीत, कंत्राटी किंवा शासकीय छोट्या मोठ्या नोकर्‍या मिळतात किंवा ते सटरफटर व्यवसाय करू लागतात.

मात्र उरलेले सव्वा कोटी नवे कोरे बेरोजगार तरूण-तरूणी डोक्यात वादळं, वीजा, उर्मी आणि सळसळ घेऊन जंगलात भुकेला वाघ किंवा सिंह फिरावा तसे रानोमाळ फिरू लागतात. “कोणी काम देता का काम” असं विचारित. जात, धर्म, राजसत्तेचे ठेकेदार त्यांना द्वेषाचे असे काही डोस पाजतात की या झुंडींचे हात सदैव कापू की मारू यासाठी सळसळत असतात. १९७० च्या दशकात ह.मो.मराठे यांनी एका बेरोजगार युवकाचं जगणं “नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी” मध्ये टिपलं होतं. शंकरची “जनअरण्य” तर ग्रेटच होती.

- Advertisement -

आज शेती पुर्ण उध्वस्त झालीय. शेतकरी भुकेकंगाल बनतोय. सरसकट सर्व खेड्यांना शहरात यायचंय. शहरी रोजगार, व्यापार, सेवाक्षेत्र आकसतय. कंत्राटीकरण हा परमेश्वराला पर्याय बनलाय. जागतिक बाजारपेठ, वर्ल्ड बॅंक, जागतिक शेयर बाजार, गुंतवणूक आदींची एलपीजीची धोरणं भारतावर बंधनकारक असल्यानं भारताची घुसमट होतेय. नैसर्गिक साधन संपत्ती भारतात अमाप आहे. बुद्धीमत्ता अफाट आहे. पण जातीयता, लिंगभाव आणि धर्मांधता यांनी हा देश पोखरला जातोय.

अंबानी -अदानी जगातल्या आघाडीच्या श्रीमंतांमध्ये गणले जाताहेत आणि ३० कोटींना धड दोन वेळचं खायला मिळत नाहीये. देशाच्या निम्म्या म्हणजे ६५ कोटी लोकसंख्येला झोपडपट्टी किंवा कच्च्या निवार्‍याचा आसारा घ्यावा लागतोय. पालावर, पाड्यावर राहावं लागतंय. शिक्षण, रोजगार, आरोग्याचे धिंडवडे निघालेत.

प्रत्येक जातीत, अगदी अनु.जाती, जमाती, ओबीसी, भटके यातही वर्ग निर्माण झालेत. ज्यांचं थोडं बरं चाललंय ते आप्पलपोटे बनलेत. धार्मिक पर्यटन हाच देशातला सगळ्यात मोठा टुरीझम आहे. अंधश्रद्धा, अडाणीपणा, अज्ञान, सरंजामी मानसिकता, भ्रष्टाचार, जातीय व्होट बॅंका हेच इथल्या सर्व पक्षीय राजकारण्याचं भांडवल आहे.

बरं आपला कॉमन मॅन पण असा भारीय की त्याला शाळा, दवाखाना, सारं काही खाजगीचं हवंय. पण नोकरी मात्र सरकारी हवीय. लग्नाच्या बाजारात आज उघडपणे बोललं जातं की, “मुलाला/मुलीला पगार तसा फार नाहीये, पण वरकमाई मजबूत आहे.” वसाहतवादी मानसिकता इतकी पुरेपुर भिनलीय की आमचं सारंकाही संकरिताय. पण गुलामी हाडीमाशी भिनलेली असल्यानं तिचाही आम्हाला अभिमानच वाटतो.

सरकार तर सगळं काही खाजगी करायला निघालंय. लाल किल्ला खाजगी कारखानदाराला चालवायला दिला. रेल्वे, विमानतळं, बंदरं, रस्ते, दवाखाने, शाळा, सगळंच खाजगीच्या ताब्यात द्यायचा सपाटा चालूय. त्यामागे जागतिक अर्थकारणाय. व्यापारी आणि राजकीय हितसंबंध आहेत.

अनुदानं, अत्याचारविरोध आणि आरक्षण यात बहुतेकांची डोकी गुंतून पडलीयत. राजकारणी बेरोजगार लोकांना गॅंगवॉरला प्रवृत्त करताहेत.

आपल्या प्रत्येक सार्वजनिक अपयशाचं खापर फोडायला कोणी तरी दगड हवाय. मग सांगा आम्ही अमूक तमूक असल्यानं आमचा विकास झाला नाही, ब्लेम गेम. सार्वत्रिक तक्रार मोहीमा. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तशी वाहिन्यांवरून पेड कॅंपेन रंगवली जातात. प्राईम टाईमला कोंबडे झुंजवले जातात.

जमीन, हवा, पाणी, उर्जा, खनिजं ही सारी संसाधनं ही निसर्गाची देणगी. पण तिचं वाटप सर्वांना समान व्हावं हे देशाच्या मालक लोकांना मान्य नाही. त्याबद्दल ओपीनियन मेकर्स, बुद्धीजिवी आणि माध्यम सैनिक तोंडात मिठाची गुळणी धरणार. अमक्याच्या पोटी जन्मलो हीच मालक होण्यासाठीची पात्रता.

आरक्षणाला तीव्र विरोध करणारे, मॅनेजमेंट कोटा, कॅपिटेशन फी देऊन शुन्य मार्कांवरही प्रवेश घेतलेल्यांबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. धार्मिक क्षेत्रातील आरक्षणावर अळी मिळी गुप चिळी. ज्ञान, संपत्ती, प्रतिष्ठा, मानमान्यता, सत्ता, सारं काही मोजक्यांच्या मालकीचं. त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही. श्रेणीबद्ध समाज रचनेतले तळचे थर प्रगती करताहेत आणि आम्ही मात्र मागे पडतोय तर करा सुलभीकरण. उथळ मांडणी आणि सुमारांची सद्दी. सगळीकडे प्लॅस्टीकची रद्दी.

जातीनं व्यवसाय ठरवून दिले होते. व्यवसायवर उत्पन्न अवलंबून असतं. म्हणजे जातीसंस्था ही मुलत: अर्थव्यवस्था होती. आणि रिलिजियस पॉवर इज बेसिकली पोलिटिकल पॉवर! राजकारणी, माध्यमं, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि धर्मसत्ता यांची बेरोजगारांना कसं वापरायचं याबद्दल महायुती किंवा महाआघाडी आहे. सारा प्रवास उलट्या पावलांचा! पुर्वी जाती होत्या, पण जातीनिर्मुलनाची चळवळ जोमात होती. आता जाती संघटना जोशात आहेत नी प्रागतिक विचार कोमात गेलेत.

माफिया माजलेत नी बेरोजगार बिनडोकपणानं आपल्या जगण्याची सारी सुत्रं चोरांच्या हातात देताहेत! एकुण काळ मोठा कठीण आलाय !

हे असं तरी हे असं असणार नाही….

वो सुबह कभी तो आयेगी, वो सुबह कभी तो आयेगी
इन काली सदियों के सर से, जब रात का आंचल ढलकेगा
जब दुख के बादल पिघलेंगे , जब सुख का सागर छलकेगा
जब अम्बर झूम के नाचेगी, जब धरती नग़मे गाएगी
वो सुबह कभी तो आयेगी …

– प्रा. हरी नरके