Satara News : रात्रीच्यावेळी एका दुचाकीवरून दोघे निघाले होते, जाता जाता अचानक गाडी धडकली अन् पुढे…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात रात्रीच्यावेळी वाहने चालवताना अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. अशावेळी काहींचे जीवही जात आहे. अशीच घटना सातारा तालुक्यातील वेळे या ठिकाणी घडली. दोघे मित्र एकमेकांसोबत गप्पा मारत दुचाकीवरून जात असताना रात्रीच्या अंधारात समोर असलेला ओढ्यावरील पुलावरील कठडा दिसला नाही आणि कठड्यावर जाऊन दुचाकी धडकली. यामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वेळे गावातून गुळुंब गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला.

प्रमोद गंगाराम यादव (वय 20, रा. यशवंतनगर वाई) व प्रथमेश संतोष खैरे (वय 21, रा. ब्राम्हणशाही वाई) अशी या दुचाकीच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी आठ वाजण्याच्या सुमारास प्रमोद यादव व प्रथमेश खैरे हे दोघेजण दुचाकीवरून गुळुंबकडे निघाले होते. या दरम्यान ते वेळे येथील स्मशानभूमी जवळील पुलाजवळ आले. त्या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्यामुळे पुलाच्या बांधकामाला पत्रे लावण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात या दोघांना ते पत्रे न दिसल्यामुळे त्यांची दुचाकी पत्र्यांना धडकून समोरील भिंतीवर जाऊन आदळली आणि दुचाकीवरील प्रमोद व प्रथमेश हे जवळच्या ओढ्यात जाऊन पडले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी याबाबतची माहिती भुईंज पोलिसांना दिली. या अपघाताची माहिती मिळताच पेट्रोलिंगवर असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पीएसआय रत्नदीप भंडारे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रात्री उशिरा प्रमोद व प्रथमेश यांना पाण्यातून बाहेर काढले व कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या अगोदरच प्रमोद व प्रथमेश यांचा मृत्यू झाला होता. भुईंज पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तसेच या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी वेळे ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.