औरंगाबाद | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती लोकोपयोगी उपक्रम राबवून साजरी करण्याचा निर्णय तरुणांनी घेतला आहे. अमोल भालेराव, अमोल साळवे या तरुणांनी स्वतःच्या खर्चातून ‘थँक्यु डॉ. आंबेडकर’ हा डिस्प्ले तयार करून आंबेडकरी अनुयायांना एक वेगळी भेट दिली आहे. भडकलगेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा डिस्प्ले उभारण्यात आला आहे. यास विजयराव साळवे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विशाल बोर्डे, अनमोल लिहिणार, अमोल कतले, विशाल बनकर यांनी सहकार्य केले आहे.
जगभर कोरोनाने थैमान घातले असून सण, उत्सवाच्या उत्साहाची जागा भीतीने घेतली आहे. यातच सलग दोन वर्ष भीमजयंती साजरी न करता आल्याने आंबेडकरी युवकांत निराशा आलेली होती. परंतु ही निराशा दूर सारत लोकोपयोगी उपक्रम राबवून भीमजयंती साजरी करण्यात येत आहे. भीमजयंतीच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांना अमोल भालेराव, अमोल साळवे या तरुणांनी एक वेगळी भेट देऊ केली आहे.
यापूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेने शहराच्या सौंदर्यात भर घालण्याकरिता ‘लव्ह औरंगाबाद’ चे डिस्प्ले बोर्ड उभारले आहेत. त्याच अनुषंगाने या तरुणांनी ‘थँक्यू डॉ. आंबेडकर’ हा डिस्प्ले तयार केले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हजारोंच्या संख्येने आयुयायी भडकलगेट येथे अभिवादन करण्यासाठी येतात. आता अभिवादना सोबत या ठिकाणी बाबासाहेबांप्रती कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होण्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे. केवळ आंबेडकरी अनुयायीच नव्हे तर देशातील सर्व शोषित पीडित वंचित घटकांसाठी बाबासाहेबांचा संघर्ष होता. या फलकातून कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याची आमची भूमिका असल्याचे अमोल भालेराव व अमोल साळवे यांनी सांगितले. दरम्यान, या डिस्प्लेचे अनावरण कोणत्याही राजकीय व्यक्तींच्या हस्ते न करता लहान मुलाच्या हाताने करण्यात आले.