कराड | सातारा जिल्हा बॅंकेची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यानंतर तत्कालीन जेष्ठ नेते या सर्वाच्या विचाराने बॅंकेची एक परंपरा स्थापन करून नावलाैकिक मिळवून दिला. त्या बॅंकेची बिनविरोध संचालक व चेअरमन निवड करणे ही वाई तालुक्यासाठी भूषणावह गोष्ट असल्याचे मत सातारा जिल्हा बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितिन पाटील यांनी व्यक्त केले.
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आले असता ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित उपाध्यक्ष अनिल देसाई, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सारंग पाटील, जशराज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पांडुरंग चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, आज चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्यासाठी आम्ही आलो आहे. सातारा जिल्हा बॅंक ही 14 हजार कोटींचा व्यवसाय करणारी बॅंक आहे. भारतामध्ये एक नंबरची बॅंक आहे. आम्हां तरूणांना जिल्ह्यातील नेत्यांनी काम करण्याची संधी दिलेली आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जावू न देता आहे त्यापेक्षा उंचीवर बॅंकेला नेण्याचे काम करणार असल्याचा विश्वास यानिमित्ताने शेतकरी संभासदांना देतो.