शिवाजी महाराजांच्या सर्वाधिक उंच पुतळ्याचा डोळ्याचे पारणे फेडणारा अनावरण सोहळा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – फटाक्यांची प्रचंड आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, लाईट शोचा लखलखाट आणि हातात भगवे ध्वज घेऊन लाखोंच्या संख्येने उपस्थितीत नागरिकांच्या साक्षीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ५२ फूट उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी रात्री अनावरण करण्यात आले. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणाने यावेळी आसमंत दुमदुमला. शिवरायांचे शिवतेच पाहण्यासाठी क्रांती चौकात जमलेल्या विक्रमी अलोट गर्दीच्या डोळ्याचे पारणे फिटले.

महापालिकेने क्रांती चौकात उभारलेल्या देशातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याचे शुक्रवारी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून अनावरण करण्यात आले. व्यासपीठावर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री सुभाष देसाई, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील, खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार सतीश चव्हाण, शिवसेनेचे संपर्कनेते विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, हरीभाऊ बागडे, अतुल सावे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, माजी सभापती राजू वैद्य यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

क्रांती चौकातील शिवयारांचा पुतळा भव्यदिव्य असल्याने कार्यक्रमाची देखील जय्यत तयारी करण्यात आली होती. शेकडो दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. पुतळ्याला सर्वत्र फुलांची सजावट करण्यात आली होती. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी सायंकाळपासूनच क्रांती चौकात गर्दी झाली. पोलिसांनी सिल्लेखाना, दूधडेअरी चौक, जिल्हान्यायाल व गोपाळ टी हाऊस चौकात रस्ते बंद केले होते. क्रांती चौकापासून हे चारही रस्ते शिवप्रेमींनी गजबजून गेले. हातात भगवे ध्वज, जयभवानी जय शिवाजीच्या घोषणा देत तरुण, तरुण, महिला-पुरुषांनी प्रचंड गर्दी केली. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांचे आगमन झाले. ठाकरे यांनी शिवप्रभुंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या हस्ते मशाल पेटवण्यात आली. त्यानंतर लाईट आणि साउंड शो सुरु झाला व फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात आली. लाईट आणि साऊंड शो व फटाक्यांच्या आतषबाजीने क्रांती चौकचा परिसर फुलून गेला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा हातात भगवा झेंडा घेवून त्यांनी तो फिरवला. त्यानंतर शिवप्रेमीं ठेका धरला. अनेकांनी चारचाकी वाहने, परिसरातील इमारती, अग्निशमन, पोलिसांच्या वाहनांवरच चढून हा ऐतिहासिक सोहळा पाहिला. क्रांती चौकात येणाऱ्या चारही रस्त्यांवर एक ते दीड किलोमीटरपर्यंत शिवप्रेमींची अलोट गर्दी होती.

Leave a Comment