“पेट्रोल डिझेल दरवाढीसाठी UPA सरकार आणि रशिया जबाबदार”- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीसाठी सरकारने रशियाला जबाबदार धरले आहे. आधीच्या यूपीए सरकारचे ऑइल बॉण्ड आणि रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.

राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या, “जागतिक बाजारपेठेत पुरवठा खंडित झाल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय मागील यूपीए सरकारने जारी केलेल्या 2 लाख कोटी रुपयांच्या ऑईल बाँडचाही परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवर होत आहे. मात्र, याला तोंड देण्यासाठी सरकार सातत्याने पावले उचलत आहे.”

2026 पर्यंत परिणाम दिसून येईल
अर्थमंत्र्यांनी सांगितले की,” ऑइल बाँड्सच्या बदल्यात 2026 पर्यंत व्याज भरावे लागेल. याचा थेट परिणाम करदात्यांच्या पैशावर होणार आहे. दशकभरापूर्वी जारी करण्यात आलेल्या ऑईल बाँडचा फटका अजूनही ग्राहकांना सहन करावा लागत आहे, परिणामी किरकोळ बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत.”

सेस आणि सरचार्जवर हे उत्तर देण्यात आले
विरोधकांकडून जास्त सेस आणि सरचार्ज वसूल केला जात असल्याच्या प्रश्नावर अर्थमंत्री म्हणाल्या,” सामाजिक सुरक्षा असलेल्या योजनांमध्ये याचा वापर केला जातो.” त्या म्हणाल्या की,” 2013 ते 2022-23 पर्यंत हेल्‍थ आणि एज्युकेशन सेसच्या रूपात 3.8 लाख कोटी जमा झाले तर 3.90 लाख कोटी रुपये खर्च झाले. यातील बहुतांश पैसा केंद्राकडून राज्यांमध्ये राबविल्या जाणाऱ्या सामाजिक योजनांवर खर्च करण्यात आला आहे.”

राज्याचा करही भरला
सीतारामन म्हणाल्या की,”कोरोनाच्या काळात वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासोबतच केंद्र सरकार राज्यांच्या कर संकलनातील कमतरताही भरून काढत आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत आम्ही आणखी राज्यांना 43 हजार कोटी रुपये वितरित केले आहेत.” माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी एअर इंडियामध्ये सरकारने केलेल्या पैशांच्या गुंतवणुकीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडून तेच केले जात असल्याचे सांगितले.