वॉशिंग्टन : अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील इंडियाना राज्यातील एका फेडेक्स सेंटरवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात भारतीय वंशाच्या चार शीख बांधवांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एकूण आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर धक्कादायक बाब म्हणजे आठ जणांची निर्दयी हत्या केलेल्या 19 वर्षीय आरोपीने देखिल स्वतः वरही गोळी झाडली आहे. दरम्यान या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
ब्रँडन स्कॉट असं या आरोपीचं नाव आहे. तो इंडियाना तील रहिवासी आहे. दरम्यान हा हल्लेखोर फेडेक्सचा पूर्व कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.
या सेंटर मध्ये डिलिव्हरी सेवा देण्याचे काम करणाऱ्या लोकांमध्ये नव्वद टक्के लोक भारतीय-अमेरिकन आहेत. यातील बहुतांशी कर्मचारी स्थानिक शीख समुदायातील आहेत. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना शिख समुदायाचे नेते गोविंद सिंह खालसा यांनी म्हटले आहे की,’ ही अत्यंत हृदयद्रावक घटना असून संपूर्ण शीख समुदाय दुःखात आहे’.
मॅरियन काऊंटी कोरोनरच्या कार्यालयाने मृतांची ओळख पटली असून मृत झालेल्या लोकांची नावं मॅथ्यू आर अलेक्झांडर (32), सामरिया ब्लॅक वेल (66), अमरजीत जोहल (64), जसविंदर कौर(68), जसविंदर सिंह(48), अमरजीत सेखो(19), करली स्मिथ (74), जॉन विसर्ट अशी आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या संबंधित गोळीबाराच्या घटनेची माहिती मला मिळाली आहे. अंधाधून केलेल्या गोळीबाराच्या हिंसाचाराला त्यांनी एक महामारी संबोधले आहे. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘बंदुकीतून केलेल्या गोळीबारात अनेक अमेरिकन नागरिकांचा दररोज जीव जात आहे. त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा कलंकित होत आहे. अशा घटना देशाच्या आत्म्यावर हल्ला करतात’. असे ते म्हणाले
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.