टोकण नसताना लसीकरण : आरेरावी, गर्दी करणाऱ्या नगसेविका व पतीसह सहा जणांवर गुन्हा

सातारा येथील माजी नगराध्याक्षा स्मिता घोडके यांच्यावर शाहुपुरी ठाण्यात गुन्हा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील राजवाडा परिसरात असलेल्या कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात टोकण नसतानाही विनाकारण गर्दी करत, अरेरावी करून लसीकरण करण्यास भाग पाडणाऱ्या सातारा नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहाजणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेविका स्मिता घोडके, त्यांचे पती चंद्रशेखर घोडके, पद्मावती नारकर, सुभाषचंद्र हिरण, रसीला हिरण, दीपलक्ष्मी शालगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कस्तुरबा नागरी आरोग्य केंद्रात शनिवार दि. २९ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास टोकण वाटप करुन लसीकरण सुरु होते. यावेळी सर्वजण रांगेत उभे राहून शासन नियमांचे पालन करत होते. याचवेळी नगरसेविका स्मिता घोडके, चंद्रशेखर घोडके (वय ५३, रा. सातारा), पद्मावती नारकर (वय ७१, रा. सातारा), सुभाषचंद्र हिरण (वय ६८, रा. सातारा), रसीला सुभाषचंद्र हिरण (वय ६८, रा. सातारा), दीपलक्ष्मी सचिन शालगर (वय ४६, रा. सातारा) हे सर्वजण तेथे आले. त्यांनी आरोग्य केंद्रात विनाकारण गर्दी केली.

यावेळी संशयितांनी थेट अरेरावी करत टोकण नसतानाही लसीकरण करण्यास भाग पाडले. यामुळे लसीकरण केंद्रातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवक घाबरुन गेले तर तेथे लसीकरणासाठी आलेले नागरिक भितीच्या छायेखाली गेले. या सर्व प्रकारानंतर परिचारिका सुजाता सुरेश साठे (वय २४, रा. बावधन, ता. वाई) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी नगरसेविका स्मिता घोडके यांच्यासह सहाजणांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करत आहेत.