औरंगाबाद : हज किंवा उमराहसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे. हज समिती आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून ही गोष्ट समोर आली आहे. त्यामुळे हज यात्रेला जाण्यासाठी अर्ज दाखल करणाऱ्या यात्रेकरूंनी आतापासून लस घेण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना हज समितीकडून करण्यात आल्या आहेत.
दरवर्षी हज यात्रेसाठी अर्ज मागविण्यापासून ते लॉटरी पद्धतीने हज यात्रेकरू निवडण्याची पद्धत राबविण्यात येते. ही प्रक्रिया दोन ते तीन महिने चालत होती. यंदाच्या वर्षी ही प्रक्रियाही पुर्ण झालेली नाही. गेल्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाच्या वर्षासाठी समितीने अर्झ मागवले आहेत. यंदा देशभरातून फक्त ६० हजारांच्या आसपास अर्ज भरण्यात आलेले आहेत. राज्यातून हज यात्रेला जाणाऱ्या १५ हजार ५३ जणांनी, तर मराठवाड्यातून ७०५५ जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये औरंगाबादमधील ७३३ जणांनी अर्ज भरले आहेत. दरवर्षी हज यात्रेला देशभरातून एक लाखांपेक्षा जास्त अर्ज येत असतात.
यंदा किती यात्रेकरूंना परवानगी मिळणार, हे स्पष्ट झालेले नाही. ऐनवेळी याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी लस घेण्यास सुरुवात करावी. पहिली लस आणि दुसरी लस यामध्ये महिन्याभराचा अंतर लागत आहे. ज्या अर्जदारांनी लस घेतलेली नसेल. अशांना हज यात्रेसाठी जाता येणार नाही, अशीही माहिती केंद्रीय हज समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. केंद्रीय हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मसुद खान यांनी एका व्हिडिओद्वारे अर्जदारांना लस घेऊन ठेवण्याचे आवाहन केले आहे.
कोटा अद्याप उपलब्ध नाही : सौदी अरेबियाच्या सरकारने वाढत्या करोना रूग्णांची संख्या बघता, भारतासह अन्य २० देशांतील प्रवाशांना देशात येण्यास बंदी घातलेली आहे. या बंदीमुळे दोन्ही देशांमध्ये हज यात्रेपूर्वी होणारा करार अजूनही झालेला नाही. करार न झाल्यामुळे हज यात्रेचा भारताचा कोटा किती राहणार? याचीही माहिती उपलब्ध झालेली नाही.