दिग्गजांच्या प्रतिष्ठेचा आज लागणार निकाल : कराडला मतमोजणीस विलंब

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा व सांगली अशा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी चांगलाच प्रचार केला आहे. कारखाना निवडणुकीतील मतमोजनीस येथील शासकीय गोडावून येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार होती. मात्र, त्याला विलंब झाला असून कोविड नियमांच्या अनुषंगाने मतमोजणीस आलेल्यांची तपासणी करून त्यांना पोलिसांकडून मतमोजणी केंद्रात सोडले जात आहे. त्यामुळे सकाळी आठ वाजता सुरु होणारी मतमोजणी आता नऊ वाजता सुरु होणार आहे.

तब्बल ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली असून ७४ टेबलवरून मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. २१ उमेदवारांचे प्रत्येक प्रतिनिधीना त्यांच्या व्यतिरिक्त प्रत्येकी पॅनेलला एक अशा तीन प्रतिनिधींमार्फत मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीत सत्तधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलकडून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या विरोधात संस्थापक पॅनेलकडून कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांनी व रयत पॅनेलकडून डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आव्हान दिले होते..

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 148 मतदान केंद्रावरून एकूण 73.25 टक्के मतदान झाले. कारखाना निवडणुकीसाठी 47 हजार 145 सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यांच्यापैकी 34 हजार 532 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कारखाना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.