अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अकोल्यातील गावगुंडाला अटक
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अकोल्यात एका अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या घटनेने राज्यातील महिला आणि मुली सुरक्षित नाहीत असे दिसून आले आहे. एका गावगुंडाने चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात केल्याची घटना घडली आहे. यानंतर तिला सार्वजनिक स्थळी विवस्त्र करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी अकोल्यातील खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरे उर्फ गणीभाईला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता अटक केली आहे.
पोलिसांचा हलगर्जीपणा
अकोल्यात चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सिगारेटचे चटके देत, तिचं मुंडन करण्यात आलं. नंतर तिच्यावर अमानवीय लैंगिक अत्याचार करण्यात आले. कैलासटेकडी स्मशानभूमी परिसरात तिला विवस्त्र करीत तिची धिंड काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला. शहरातील कैलास टेकडी भागात परिसरात गुंड गणेश कुमरे याची दहशत आहे. पीडित मुलीचे वडील मोलमजुरी करतात. तिला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे. गेल्या दोन वर्षांपासून या गुंडानं सातत्यानं दहशत माजवत मुलीवर अत्याचार केला. मात्र दोनदा पोलिसात जाण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा गावगुंड निर्ढावला. या गावगुंडानं मुलीचे लैंगिक शोषण सुरु ठेवलं.
या गुंडानं दहशत माजवत मुलीवर पुन्हा अत्याचार केला. शुक्रवारी या प्रकरणाची माहिती स्त्री चळवळीतील नेत्या आणि वंचितच्या प्रदेश महासचिव अरूंधती शिरसाट यांना मिळाल्यावर सदर प्रकरणाला वाचा फुटली. मात्र अकोल्यातील खदान पोलिसांनी या प्रकरणी असंवेदनशीलता दाखवल्याचा आरोप अरूंधती शिरसाट यांनी अकोला पोलिसांवर केला आहे.
गावगुंड गणेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी
अकोल्यातील कैलासटेकडी भागातील गावगुंड अशी गणेशची ओळख असून गणेशला कैलासटेकडी परिसरात ‘गणीभाई’ या टोपणनावाने ओळखतात. या गुंडाचा सदर परिसरात दारू आणि गांजाविक्रीचा बेकायदेशीर धंदाही सुरु असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर खदान पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गणेशच्या दहशतीमुळे लोक तक्रार करण्यास पुढे येत नसल्याचे समजते.
याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपी गुंड गणेश कुमरेवर गुन्हा दाखल केला. तर पीडित मुलीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. अकोला पोलिसांची याप्रकरणी प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर मुलीच्या समाजातील नेत्यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवत मुलीच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेविषयी अनेकदा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. याबाबत पोलिसांनी कडक भूमिका घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. सामाजिक दबावामुळे गणेशला पोलिसांनी अटक केली आहे, परंतु पुन्हा असे प्रकार घडू नयेत याची खबरदारीही घेतली पाहिजे, अशी परिसरात चर्चा सुरु आहे.