Friday, January 27, 2023

विरार दुर्घटना ही राष्ट्रीय बातमी नाही… ‘त्या ‘ रुग्णालयांवर सक्तीने कारवाई : आरोग्यमंत्री राजेश टोपे

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विरारमधील वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागल्याने १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत बोलताना राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत ‘ही काही राष्ट्रीय बातमी नव्हे,राज्य सरकार सर्वतोपरी मदत करत आहे’ अशी टिप्पणी केली आहे.

विरारच्या घटनेत १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली. यानंतर मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विरार घटनेबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ‘ही काही राष्ट्रीय बातमी नव्हे… राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुंबई महानगरपालिकेत कडूनही आर्थिक मदत म्हणून पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. अशी दहा लाखांची मदत घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना करण्यात येणार आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे’ असे ते म्हणाले.

- Advertisement -

 

फायर ऑडिट नसणाऱ्यांची गय केली जाणार नाही

ज्या रुग्णालयांचे फायर ऑडिट नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे संकेतही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की रुग्णालयांना आदेश दिलया प्रमाणे ज्या रुग्णालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिकल ऑडिट झालेले नाहीये अशा रुग्णालयांवर सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

याबरोबरच राज्यातील रेमडीसीवीर , ऑक्सिजन आणि लसीकरण यांच्या पुरवठा बद्दल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितला आहे