Wednesday, February 1, 2023

टी-20 विश्वचषकानंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणे सोडू शकतो !

- Advertisement -

नवी दिल्ली । विराट कोहलीने आयपीएल (IPL 2021) सुरू होण्यापूर्वी भारतीय चाहत्यांना दोन धक्के दिले आहेत. कोहलीने गेल्या आठवड्यात येणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर भारतीय टी -20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर कोहलीने आयपीएल 2021 नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. कोहली 2016 पासून कसोटी, एकदिवसीय, टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारताचा तर आयपीएलमध्ये RCB चा कर्णधार आहे. भारताचा कर्णधार असताना कोहलीला आतापर्यंत संघाला एकही आयसीसी जेतेपद मिळवून देता आलेले नाही, तसेच तो RCB ला देखील एकदाही चॅम्पियन बनवू शकलेला नाही. कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त फलंदाजी केली असली तरी टी -20 क्रिकेटमधील त्याची कामगिरी खालावली आहे.

याशिवाय कोहली गेल्या दोन वर्षांपासून मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके करणारा कोहली नोव्हेंबर 2019 पासून एकही शतक झळकावू शकलेला नाही. फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराटने टी -20 फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. कोहली 5 नोव्हेंबरला 33 वर्षांचा होईल आणि त्याचा फिटनेस पाहता असे म्हणता येईल की, तो आणखी 4-5 वर्षे सहज क्रिकेट खेळू शकेल. क्रिकेटमध्ये अनेक वेळा असे दिसून आले आहे की, आपली कारकीर्द लांबवण्यासाठी, फलंदाज कोणताही एक फॉरमॅट खेळणे सोडून देतो. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे सारखे दिग्गज कारकीर्दीच्या शेवटच्या दिवसात फक्त कसोटी क्रिकेट खेळायचे. कोहली कोणताही एक फॉरमॅट वगळू शकतो.

- Advertisement -

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, टी -20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट या फॉरमॅटमध्ये कमी खेळेल अशी अपेक्षा आहे. भारतीय संघ टी -20 विश्वचषकानंतर सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामात 14 टी -20, 4 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. जर टी -20 विश्वचषक पुढील वर्षी देखील होणार असेल तर सर्व संघ जास्त टी -20 सामने खेळत आहेत. विराट कोहली नक्कीच आयपीएलमध्ये खेळेल मात्र तो टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यातून माघार घेऊ शकतो. गेल्या चार वर्षांत कोहलीने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही अनेकदा विश्रांती घेतली आहे ज्यात रोहित शर्मा (19 सामने) कर्णधार झाला आहे.

विराट कोहलीने याआधीच टीम इंडियाचे व्यस्त वेळापत्रक आणि वर्कलोड मॅनेजमेंटबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. आजकाल, खेळाडूंना मैदानावर येण्यापूर्वी बायो-बबलमध्ये जाणे आवश्यक झाले आहे. त्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावरही होत आहे. आता विराटला संधी आहे की, तो स्वतःला टी -20 आंतरराष्ट्रीय पासून वेगळे करून त्याच्या कामाचा ताण कमी करू शकतो.

कर्णधारपदाखाली टी 20 आंतरराष्ट्रीयमधील कामगिरी घसरली
विराट कोहली टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि टी -20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. कोहलीने कर्णधार आणि खेळाडू म्हणून 45-45 सामने खेळले आहेत. एक खेळाडू म्हणून त्याने 45 सामन्यांमध्ये 52.65 च्या सरासरीने 1657 धावा केल्या आहेत आणि 16 अर्धशतके केली आहेत. त्याचबरोबर कर्णधारपद स्वीकारल्यानंतर या खेळाडूने 12 अर्धशतकांमध्ये 1502 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 48.45 पर्यंत घसरली.