हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांनी भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याबद्दल मोठं विधान केलं आहे. विराट कोहली हा एकेकाळी माझ्य नेतृत्वाखाली क्रिकेट खेळला आहे असं तेजस्वी यादव यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या विधानाने क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर किंग कोहली तेजस्वीच्या नेतृत्वाखाली खेळला तरी कधी? असा प्रश्न विराटच्या चाहत्यांना पडला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तेजस्वी यादव म्हणाला, मी एक क्रिकेटर होतो याबद्दल कोणीही बोलत नाही. विराट कोहली माझ्या कर्णधारपदाखाली खेळला आहे. याबद्दल सुद्धा कोणी कधी काही बोललं आहे का? एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मी चांगले क्रिकेट खेळलो. टीम इंडियाचे अनेक खेळाडू माझे बॅचमेट आहेत. माझे दोन्ही लिगामेंट फ्रॅक्चर झाल्याने मला क्रिकेट सोडावे लागले अशी माहिती तेजस्वी यादव यांनी दिली. विराट कोहली आपल्या कर्णधारपदाखाली खेळला असे वक्तव्य तेजस्वी यादवने केल्यावर सगळेच चकित झाले आहेत. कोहली तेजस्वीच्या नेतृत्वाखाली खेळला तरी कधी? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. मात्र ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा तेजस्वी दिल्लीच्या अंडर-15 आणि नंतर अंडर-17 संघाकडून खेळली होती. त्या काळात विराट कोहली तेजस्वीच्या नेतृत्वाखाली खेळत असे.
तेजस्वी यादवच्या क्रिकेट करिअरला शाळेत असल्यापासूनच सुरुवात झाली. वयाच्या १३ व्या वर्षी त्याची दिल्लीच्या १५ वर्षांखालील संघात निवड झाली. यादवने त्याच्या व्यावसायिक क्रिकेट कारकिर्दीत 4 टी-20 सामने खेळले, परंतु त्याला केवळ एका डावात फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये तो 3 धावा करू शकला. याशिवाय त्याने आपल्या लिस्ट-ए कारकिर्दीत 2 सामने आणि एक प्रथम श्रेणी सामनाही खेळला आहे. तसेच त्याने आपल्या कारकिर्दीत खेळलेल्या सर्व 7 सामन्यात एक विकेट घेतली. आयपीएल 2008 मध्ये तेजस्वी यादवला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 8 लाख रुपयांत खरेदी केलं होते. मात्र त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं.