Sunday, May 28, 2023

टीम इंडियाच्या कांगारूंवरील विजयानंतर सेहवाग झाला वेडापिसा! केलं असं काही ‘ट्विट’

मुंबई । ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाने (Team India) रोमांचक विजय मिळवल्यानंतर टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नव्या दमाच्या भारतीय संघाने कांगारुंना चितपट करुन मिळवलेल्या विजयाचं सर्वांकडून कौतुक होत आहे. ऋषभ पंतने ब्रिस्बेन कसोटीत पाचव्या दिवशी ९६ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर खणखणीत चौकार खेचला आणि भारताने कसोटी जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचं माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं त्याच्या हटके शैलीत टीम इंडियाचं अभिनंदन केलंय.

“खूशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर मै घुसकर मारता है. एडलेड कसोटीनंतर ते आज भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिलाय. आपण विश्वचषक याआधी जिंकलाय, पण आजचा विजय खूप महत्वाचाय आणि हो, पंतमुळे हा विजय जास्त महत्वाचा ठरलाय”, असं ट्विट वीरेंद्र सेहवागनं केलं आहे. विशेष म्हणजे, हे ट्विट करताना सेहवागनं एका ट्रकचा फोटो ट्विट केलाय. या ट्रकच्या मागच्या बाजूस “ये नया भारत है, घर में घुसकर मारता है”, असं लिहिलंय. त्यामुळे सेहवागचं हे ट्विट चांगलंच व्हायरल होतंय.

प्रत्येक सेशनमध्ये नवा हिरो मिळालाय- सचिन
मास्टर ब्लास्टर सचिननेही भारतीय संघांचे तोंड भरुन कौतूक केलंय. भारताच्या विजयी क्षणाचा फोटो ट्विट करत सचिनने संपूर्ण टीमचं कौतुक केलंय. “प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला नवा हिरो पाहायला मिळालाय. जेव्हा आपल्याला दुखापतींना सामोरं जावं लागलं. तेव्हा आपण आणखी खंबीरपणे उभं राहिलो. स्वत:च्या सीमांना ओलांडून निष्काळजीपणे नव्हे, तर निर्भयतेने क्रिकेट खेळलो. दुखापती आणि अनिश्चिततेचा सामना अतिशय संयम व आत्मविश्वासाने केला. आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट मालिका विजयांपैकी हा एक विजय आहे. भारतीय संघाचे अभिनंदन”, असं ट्विट सचिननं केलं आहे.

दरम्यान, आस्ट्रेलिया विजयाने टीम इंडिया आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर जाऊन पोहोचली आहे. यापूर्वी न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ब्रिस्बेन कसोटीतील विजयासह भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका 2-1 च्या फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर धूळ चारण्याचा हा पराक्रम केला आहे.

ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा हा सामना अनिर्णीत राहील, असा अनेकांचा होरा होता. मात्र, शुभमन गिल (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (56) भारताच्या विजयाचा पाया रचायला सुरुवात केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य राहणे झटपट 24 धावा केल्या. राहणे माघारी परतल्यानंतर मयांक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर ऋषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या समीप नेवून ठेवले. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’