जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायत तर 16 नगरपंचायतच्या जागांसाठी मतदानाला सुरूवात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या 47 तर नगरपंचायतीच्या तीन आणि सोयगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या 13 जागांसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली असून, शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी महसूल विभागासह पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी दिली.

जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींच्या 178 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडणुकीत 84 उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर ओबीसींसाठी राखीव ठेवलेल्या 47 जागांना स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरित 47 पदांसाठी आज मतदान होत आहे. तर सिल्लोड 1, फुलंब्री नगरपंचायतीच्या दोन जागांसाठी मतदान होणार आहे. तर सोयगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र ओबीसींसाठी राखीव असलेल्या चार जागांनाही स्थगिती असल्याने 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. मतदानाची पूर्ण तयारी झाली असून नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राखीव जागांना स्थगिती दिली होती. नंतर या जागा खुल्या प्रवर्गात धरून त्यांची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकीचा सुधारीत कार्यक्रमही जाहीर केला आहे. ग्रामपंचायतीच्या 47 आणि सोयगाव नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. जानेवारी 2022 मध्ये या जागांसाठी मतदान होणार आहे.

Leave a Comment