VVS Laxman Birthday – जेव्हा डॉक्टर बनला क्रिकेटर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर Very Very Special रेकॉर्ड

नवी दिल्ली । सौरव गांगुलीचे कर्णधारपद, सचिन तेंडुलकर-राहुल द्रविडचा संघर्ष आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची खास खेळी ही भारतीय क्रिकेटची दीर्घकाळ ओळख होती. या ‘चौकडी’ने टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. 2001 मध्ये स्टीव्ह वॉ याच्या ऑस्ट्रेलियाचा 16 कसोटींचा अजेय विजयी रथ रोखण्याचा करिष्मा क्वचितच विसरला जाईल. त्यानंतर लक्ष्मणने कोलकात्यात 281 धावांची फॉलोऑन इनिंग खेळली. ज्याने केवळ टीम इंडियाच्या विजयाचा पायाच घातला नाही, तर लक्ष्मणला कसोटी क्रिकेटमध्ये एक ‘व्हेरी-व्हेरी स्पेशल बॅट्समन’ म्हणून कायमचे प्रस्थापित केले. 1 नोव्हेंबर 1974 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या लक्ष्मणचा आज 47 वा वाढदिवस आहे. तेंडुलकर, द्रविड आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज फलंदाज संघात होते त्या काळात तो भारतीय संघात खेळला. मात्र लक्ष्मणने स्वतःची जागा निर्माण केली.

MBBS सोडून हाती घेतली बॅट
क्रिकेटर होण्यापूर्वी लक्ष्मण डॉक्टर होणार होता हे फारच कमी लोकांना माहीत असेल. हैदराबादच्या लिटल फ्लॉवर स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर MBBS ला प्रवेशही घेतला. मात्र त्याची क्रिकेटची आवड कमी झाली नाही. आई-वडील दोघे डॉक्टर असूनही त्याने स्वत:चा मार्ग निवडला आणि अखेरीस MBBS सोडून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. हे करणे त्याच्यासाठी सोपे नक्कीच नव्हते. कारण घरच्यांनी त्याला काही वर्षांचाच वेळ दिला होता. मात्र आपली जिद्द आणि आवडीच्या जोरावर लक्ष्मणने क्रिकेटमध्ये ते स्थान मिळवले, ज्याचे त्याने स्वप्न पाहिले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झळकावले पहिले कसोटी शतक
लक्ष्मणने 1996 मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. काही चांगल्या खेळीनंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर 2000 मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले आणि हा त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. 2000 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीत व्हीव्हीएस लक्ष्मणने 167 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळली होती. हे त्याचे पहिले कसोटी शतक ठरले. तेव्हापासून त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावा काढण्याची प्रक्रिया त्याच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत सुरू राहिली.या शतकानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला आणि त्याने रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात 1400 हून अधिक धावा केल्या.

कोलकातामध्ये खेळली 281 धावांची इनिंग
पुढच्याच वर्षी ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला आणि कोलकाता कसोटीत फॉलोऑन घेऊन खेळताना लक्ष्मणने 281 धावा केल्या. ज्याची कसोटी इतिहासातील सर्वोत्तम खेळींमध्ये गणना केली जाते. लक्ष्मणच्या द्विशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा 16 कसोटींचा विजय रथ रोखला. 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही लक्ष्मणची बॅट कांगारू संघाविरुद्ध जोरदार चालली होती. त्यावेळी त्याने 2 शतके झळकावली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मजबूत रेकॉर्ड
लक्ष्मण पुढील दशकात भारतीय कसोटी संघाच्या मिडल ऑर्डरचा प्राण राहिला आणि ‘फॅब फोर’चा भाग बनला. त्याने भारतासाठी 134 कसोटी सामन्यांमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीने 8781 धावा केल्या. यामध्ये 17 शतके आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची एकदिवसीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 6 शतके झळकावली. यापैकी केवळ 4 ऑस्ट्रेलियाविरुद्धच आले. लक्ष्मण हा सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 हून अधिक कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.

You might also like