सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई एमआयडीसीमधील साईपर्ण या कंपनीत चोरट्यांनी तब्बल 6 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या चोरीची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर. वाई पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवून अवघ्या बारा तासाच्या आत या गुन्ह्यातील पाच जणांना गजाआड केले.
वाई एमआयडीसीमधील चोरी प्रकरणी वर्षा किशोर जाधव (वय 29), उमा रवींद्र जाधव (वय 30), ज्योती प्रकाश जाधव (वय 28, तिघे रा.लाखानगर वाई), प्रकाश भीमा मोकलजी (वय 29), सचिन विलास सपोनिशी (वय 25, रा.काशीकापडी झोपडपट्टी वाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई एमआयडीसीमधील साईपर्ण या कंपनीत मार्च 2020 ते दि.15 जुलै 2021 च्या दरम्यान चोरट्यांनी कंपनीमध्ये प्रवेश करून कंपनीतील इलेक्ट्रिक मोटारी, स्विच, पीव्हीसी पाईप व इतर साहित्य असा सुमारे 6 लाख 8 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेले होते. या चोरीच्या घटनेची फिर्याद डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी वाई पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
याप्रकरणी तपास करताना वाई एमआयडीसी, बोपर्डी परिसरात गस्त वाढवून व मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकला. त्यावेळी चोरलेल्या मालासह तीन महिला व दोन पुरुष यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने दि. 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्या चोरट्याकडून कंपनीतुन चोरून विकलेला माल व एक टेम्पो हस्तगत केला आहे.
आणखी एका गुन्ह्याची कबुली –
या चोरट्यामधील सचिन याने दहा दिवसांपूर्वी सावंत स्टोन क्रेशरमधील मोटर चोरून विकल्याची कबुली दिली. तीही मोटर हस्तगत केली असून, तो मोटर चोरण्यात माहिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.