एसटी कर्मचाऱ्यांना पगाराची प्रतीक्षा

औरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांवर मागील महिन्याचा पगार न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ऑगस्ट महिना उजाडला असला तरीही या कर्मचाऱ्यांना अद्यापही जुलै महिन्याचा पगार मिळाला नसल्यामुळे बऱ्याच जणांना उसणे पैसे घेऊन कुटुंबियांचा उदरनिर्वाह करावा लागत आहे.

राज्य परिवहन महामंडळातील अडीच हजार कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचा पगार मिळालेला नाही. यामुळे आता पगार केव्हा होईल याकडे कर्मचारी वर्गाचे लक्ष लागून आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांनी कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी उसणे पैसे घेतले होते. परंतु असे किती दिवस चालणार असा प्रश्न या एसटी कर्मचाऱ्यांना पडला आहे.

सणवार तोंडावर असतानाच घरात पैसे नाही याच विचारात कर्मचारी वर्ग पगाराकडे लक्ष लावून बसला आहे. काहींचे घरभाडे थकीत झाले आहे. आता ऑगस्ट महिना देखील संपत आला असताना जुलै महिन्यातल्या पगारासोबतच ऑगस्ट महिन्याचा पगार केव्हा होईल की यासाठीही तात्काळत बसावे लागेल असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना पडला आहे.