बॉलिवूडला कोरोनाचा धक्का; संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईत निधन

मुंबई । बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये लोकप्रिय असणाऱ्या संगीतकार साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. आठवडाभरापूर्वीच वाजिद यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आज प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले.

रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूला एका चांगल्या संगीतकाराला गमवावं लागले आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

करोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं ‘हिट कॉम्बिनेशन’ होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.

‘दबंग’, ‘वॉन्टेड’, ‘वीर’, ‘नो प्रॉब्लेम’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘पार्टनर’ यासह सलमानच्या विविध चित्रपटांची गाणीही वाजिद यांनी गायली होती. साजिद-वाजिद जोडीने ‘एक था टायगर’, ‘दबंग’, ‘दबंग २’, ‘दबंग ३’, ‘पार्टनर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘रावडी राठोड’, ‘हाउसफुल २’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांना संगीत दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.