कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केले. मात्र, सातारा जिल्ह्यातील रयत अथणी वगळता अन्य कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे साखर कारखान्यांनी एका आठवड्यात ऊसदर जाहीर न केल्यास सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन स्थापन केलेल्या ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी विश्वास जाधव, संघटनेचे श्रीकांत भोसले, गिरीश देशपांडे, अधिक सावंत, अनिकेत साळुंखे, भरत चव्हाण, ज्ञानदेव पवार, सुहास शिंदे, रोहीत जाधव शिवाजी चव्हाण आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
सचिन नलवडे म्हणाले, “कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करून दराची कोंडी फोडली आहे. सातारा जिल्ह्यातील रयत अथणी शुगरने फक्त ऊसदर जाहीर केला आहे. उर्वरित साखर कारखानदार मूग गिळून गप्प आहेत. उर्वरित साखर कारखान्यांना या आठवड्यात उसाचे दर जाहीर करून साखर कारखाने सुरू करावे, अन्यथा सर्व शेतकरी संघटना मिळून ऊसदर संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू करतील.
बळिराजा संघटनेचे विश्वास जाधव म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. खतांच्या किमती वाढल्या आहेत. मजुरांची मजुरी वाढली आहे. मात्र, ऊसदर त्या पटीत वाढत नाहीत. दर वर्षी ऊसदर कमी होऊ लागले आहेत. साखर कारखान्यांना उपपदार्थ निर्मितीतून उत्पन्न मिळते, तरीही दर दिले जात नाहीत. येत्या आठवड्यात साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्यास सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. जोपर्यंत दर जाहीर केला जात नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही