पेट्रोल पंपावर पाणीमिश्रीत पेट्रोल; नागरिकांनी घातला गोंधळ

औरंगाबाद – शहरातील एन -7 भागातील रिलायन्स पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोलचा पुरवठा होत असल्याने काल सायंकाळच्या सुमारास वाहनधारकांनी पंपावर गोंधळ घातला. नागरिकांनी पाणी मिश्रित पेट्रोल बाटल्यांमध्ये भरून पंप चालकांना जाब विचारला, बंद पडलेल्या दुचाकी पंपावरची लावल्या. नागरिकांचा जमाव वाढल्याने सिडको ठाण्याचे पोलिस आणि शहर पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी याबाबत पंचनामा केला आहे.

काल दुपारी एन-7 भागातील रिलायन्स पंपावर काही जणांनी दुचाकी मध्ये पेट्रोल भरले. परंतु, थोड्या वेळातच त्यांचा दुचाकी बंद पडत असल्याचे दिसून आले. त्यांनी गॅरेजवर दुरुस्तीसाठी दुचाकी नेल्यानंतर पेट्रोल मध्ये पाणी असल्याचे लक्षात आले. हा प्रकार बर्‍याच जणांसोबत घडल्याने त्यांनी पाणी मिश्रित पेट्रोल घेऊन पेट्रोल पंप गाठला. तेथील कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला सुरुवातीला चालकाने दमदाटी करीत नागरिकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु तक्रार करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढतच गेली. पाहता पाहता जवळपास दोनशे नागरिक जमा झाले. पंपावर गोंधळ वाढू लागल्याने पंप चालकांना लाईट बंद करून टाकली. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना पाठवले. तसेच घटनेची माहिती पुरवठा विभागाला दिली.

पुरवठा विभागाचे आर. के. मंडके आणि पुरवठा निरीक्षक संजय सोनवणे, कविता गिराने, महसूल सहाय्यक राऊत घटनास्थळावर दाखल झाले नागरिकांनी तान्या पाणी असलेले पेट्रोल दाखवले त्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंपावरून 3 सॅम्पल घेतले. पोलिसांनी येथे जमलेल्या जमावाला निघून जाण्यास सांगितले त्यानंतर जमाव निघून गेला. परंतु, अनेकांनी दुचाकी पंपावरची लावल्या. या प्रकरणी अहवाल आल्यानंतर पेट्रोल पंपावर कारवाई केली जाईल, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.