वंचित गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी फेरनियोजन गरजेचे : प्रा. नितीन बानुगडे-पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

उपसा सिंचन योजनांच्या पाण्यापासून वंचित असणार्‍या गावांचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी पाणी वाटपाचे फेरनियोजन करणे गरजेचे आहे, हा धोरणात्मक प्रश्‍न असल्याने याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाण्याचे फेरवाटप करण्याबाबत मागणी करणार आहोत, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

 कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, वाकुर्डेबुद्रुक या उपसा जलसिंचन योजनांच्याबाबत आज अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत तक्रार निवारण परिषद संपन्न झाली. कृष्णा खोर्‍यातील या सर्व उपसासिंचन योजना मार्गी लावण्याचे काम शिवसेना-भाजपा युती सरकारने केले आहे. हे महामंडळ लोकाभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून प्रा. बानुगडे पाटील म्हणाले, या योजनांच्या बाबतीत आज साडेतीनशे प्रकरणे चर्चेसाठी आली त्यातील शंभर प्रकरणे जाग्यावर निकाली करण्यात आली. वंचित गावांचा पाणीप्रश्‍न सध्या महत्वाचा आहे आज अनेक योजना पूर्णत्वाकडे आल्या आहेत. उपलब्ध पाणी आणि वाढती मागणी ही तफावत दूर करण्याची गरज आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला ५९४ टीएमसी पाणी आले आहे. पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी लवादाच्या अहवालानुसार ८१ टीएमसी अधिक पाणी मिळण्याची गरज आहे. त्यासाठीच पाणीवाटपाचे फेर नियोजन करावी अशी आम्ही मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे. पाणी वाटप हा धोरणात्मक निर्णय असल्याने मुख्यमंत्री व कर्नाटक व आंध्रप्रदेश सरकार याबाबत निर्णय घेईल. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४४ गावांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी वाढीव योजनेला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. भाजप शिवसेना युती सरकारने ८१-१९ हा फॉर्म्युला अंमलात आणल्यापासून शेतकरी पाणीपट्टी भरत आहेत. जलआराखड्याचा नियोजन करून ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. जल आराखड्याबरोबरच पाणी पिकनियोजनाचा आमचा प्रयत्न असणार आहे. ऊस पिकासाठी ठिंबक सिंचनाची सक्ती यापुढे केली जाईल. पाणी परवानाही ऑनलाईन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Comment