विशेष प्रतिनिधी । भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अशा अयोध्या खटल्याचा निकाल आज लागला. यांवर सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपली प्रतिकिया नोंदवत अयोध्या निकालाचा सर्वांनी स्वीकार करावा असं मत उज्वल निकम यांनी व्यक्त केलं.
ते म्हणाले कि,भारतीय इतिहासातील हा महत्वाचा खटला होता, या खटल्याच्या निकालाने ना कोणाचा विजय झाला आहे ना कोणी पराभूत झाले आहे. वादग्रत जमिनीवर प्रभू रामलल्लाचा अधिकार आहे म्हणजेच देवाचा अधिकार आहे असे पक्षकारांचे म्हणणे होते. अशा परिस्थितीत भगवान राम जमिनीवर दावा करू शकतात का असा मोठा पेच न्यायपालिकेसमोर होता. मात्र आता सर्व बाबी पडताळून न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. त्याचा सर्वानी स्वीकार करावा असे निकम यांनी मत व्यक्त केले.
सुप्रीम कोर्टाने शेकडो वर्षांच्या अयोध्येतील मंदिर-मशीद वादावर ऐतिहासिक निर्णय दिला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वातील ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिरच होईल, असा निर्णय दिला. त्यामुळे हिंदू पक्षकार रामलल्लाच्या बाजूने निकाल लागला. मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतच अन्यत्र ५ एकर जमीन देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. यावेळी उज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.