सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा तर खटाव- माण, पाटणला जावा तिथे पक्षाची सीट पडलेली आहे. जावळी तालुक्यातच का हे मला समजण्या इतकी मला नक्कीच अक्कल आहे. शशिकांत शिंदेंचा काय डाव आहे हे नक्कीच आम्ही समजू शकतो. मी कुठे जायचे हे त्यांनी सांगायची गरज नाही. ते मी आणि माझे कार्यकर्ते ठरवू. तुम्ही पाहिजे तेवढे वातावरण तापवा, तुम्हाला थंड करून घरी बसवण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशारा देखील आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आ. शशिकांत शिंदेंना दिला आहे.
आमदार शिंदे यांनी माझी शिफारस नसल्यानेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना बॅंकेचे अध्यक्षपद दिले नाही असे म्हटलं हाेते. त्यास आज सुरुची बंगला येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, जावळीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. केवळ सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठराव, सोसायट्या त्याच्याच होत्या, प्रत्येकजण त्याच्या विचाराचा होता. मी कधी सोसायटीत लक्ष घातले नाही, मात्र तरीही त्यांचीच लोक त्याच्या सोबत का राहिली नाहीत यांचे आत्मपरिक्षण शिंदे साहेबांनी केले पाहिजे.
पुढे आ. भोसले म्हणाले, शिंदे साहेबांना माझ्या चेअरमन पदाची एवढी काळजी आहे तर मला प्रश्न विचारायचा आहे. ज्या भाऊसाहेब महाराज यांच्यामुळे आमदार झालो म्हणता. त्यांना मंत्रिपद मिळावे म्हणून किती तुम्ही प्रयत्न केले, याचे उत्तर त्यांनी द्यावी. आपली प्रतिमा बनविण्यासाठी त्यांनी केविलवाणा प्रयत्न करू नये. जावळीत शशिकांत शिंदे म्हणायचे अजिंक्यताराला ऊस देवू नका मी जरंडेश्वरच्या टोळ्या देतो म्हणायचे. जरंडेश्वर कारखान्यांने त्यांना टोळ्या दिल्या नाहीत, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा ऊस गेला नाही. तेव्हा अजिंक्यतारा ऊस न्यायचा असा खापर फोडायचे.
पवार साहेबाचं मत… मी मान्य केले
माझे सर्व काही पदावरच चालते असे काही नाही. माझ्या तालुक्याची कामे होत आहेत. आता पदासाठी इच्छुक होतो, मला मिळाले नाही तरी वाईट वाटत नाही. अध्यक्षपद मिळाले असते तर चांगले काम केले असते. पवार साहेबाचं मत आता जिल्हा बॅंकेत इतरांना संधी द्यावी असं होतं, त्यामुळे मी मान्य केले.