जिल्हा पोलिस दलास सक्षम करू- पालकमंत्री धनजंय मुंडे

बीड : जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ, जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे अशी जाणीव निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिस दलास केले आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस दलास १५१ मोटारसायकल, ८ स्कॉर्पिओ, डायल ११२ पथकासाठी २ बोलेरो, तसेच २ टियूव्ही गाड्या असे एकूण १६५ वाहने खरेदी केली असून, आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या गाड्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुंडे यांना बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तसेच सर्व वाहनांची रंगीत परेड करून त्याद्वारे मोटारसायकल उभ्या करून डायल ११२ आकार साकारण्यात आला.

जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत १ बीट अंमलदार या महिला असणार आहेत. अशा प्रकारची संधी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच देण्यात आली आहे. याशिवाय ६ पिंक मोबाईल पथके महिला सुरक्षेसाठी विशेष स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह कोविड विषयक निर्बंधाचे पालन करण्यासाठी संपूर्ण पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, याबद्दल मंत्री मुंडेंनी पोलिसांचे कौतुक करत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

You might also like